ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध विवियाना मॉलमधील महिलांच्या टॉयलेटमध्ये चोरून मोबाईल चित्रीकरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 35 वर्षीय महिलेला रविवारी हा भयंकर अनुभव आला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही महिला तिच्या पतीसोबत रविवारी विवियाना मॉलमध्ये गेली होती. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मॉलमधील स्वच्छतागृहात गेली. त्यावेळी स्वच्छतागृहाला लागूनच असलेल्या बाजूच्या खोलीतून एक व्यक्ती मोबाइलवरून शूटिंग करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं लगेचच बाहेर येऊन याविषयी पतीला सांगितलं. पत्नीनं तक्रार करताच तिच्या पतीनं शूटिंग करत असलेल्या व्यक्तीला पकडण्यासाठी त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलेच्या पतीला धक्का देत तो व्यक्ती तिथून पसार झाला. या संदर्भात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. विवियाना मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजच्या आधारे पोलीस संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी स्वत: काही महिन्यांपूर्वी गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरूममध्ये छुप्या कॅमेर्यातून केल्या जाणार्या चित्रिकरणाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर ठिकठिकाणच्या मॉल, मल्टिप्लेक्समधील स्वच्छतागृहांची तपासणी करण्यात आली होती. तसेच महिला सुरक्षेचे उपाय योजण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही हा प्रकार घडल्यानं सार्वजनिक ठिकाणच्या महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.