नवी मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार , दि.१४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नवी मुंबई मनसेच्या वतीने दहावी व बारावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व नवी मुंबईतील कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट, उद्योग, आरोग्य इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर व युवकांचा आदर्श नवी मुंबईकर व युवा नवी मुंबईकर म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याची माहिती मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.
हा कार्यक्रम सिवूड्स, सेक्टर २१ मधील आश्रय हॉल येथे होत असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे सरचिटणीस आणि मनसेच्या नवनिर्माण अकादमीचे प्रमुख अनिल शिदोरे, सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव व सिनेअभिनेते संतोष जुवेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदर्श नवी मुंबईकर म्हणून चित्रकार सुभाष पवार, पौरोहित मेघा गोखले , लेखिका मीरा कुलकर्णी, नाट्य निर्माते नंदकुमार म्हात्रे, योग आणि आहार तज्ज्ञ दुर्गादास सावंत, रांगोळीकार श्रीहरी पवळे व वाचन चळवळीचे सुभाष कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर युवा नवी मुंबईकर म्हणून विधी व कायदा क्षेत्रात ऍड.आशय गजभिये, आरोग्य क्षेत्रात डॉ. मनीष तरडेजा, चित्रपट क्षेत्रासाठी योगिनी चौक, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, सिनेदिग्दर्शक उमेश पवार, उद्योजक चंद्रकांत डावरे, शिक्षण संस्थाचालक अजित कुरूप यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनसे शहर सचिव ऍड.कौस्तुभ मोरे, डॉ. आरती धुमाळ, अनिता नायडू, विभाग अध्यक्ष ऍड.मंदार मोरे, नितीन चव्हाण, दीपक अनाजे, विनय कांबळे, सचिन कदम, विलास चव्हाण, अनिल कुरकुटे आदी परिश्रम करत आहेत.