नवी मुंबई : रात्रभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी सकाळपासून मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
मुंबईत वांद्रे जंक्शन, पूर्व द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, एल. बी. एस. रोड, लिंक रोडसह दादर परिसरातील रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी झाली आहे. सकाळी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्या उशीराने धावत होत्या. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्याही १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पुणे परिसरातही जोरदार पाऊस आहे. पावसामुळे खोपोली परिसरात रस्ते वाहतूक मंदावली आहे. लातूर, उस्मानाबादसह मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाची रिमझिम सुरु आहे.
मान्सून तळकोकणात आल्यावर त्याचा पुढील प्रवास अडखळला होता. मात्र उत्तर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे प्रवासाला गती मिळाली. यामुळे आता खान्देशसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पसरण्यासाठी हवामान अनुकूल असल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. येत्या २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.