पाटण : येथील जुना बसस्थानक परिसर सतत गजबजलेला असतो. या ठिकाणी रिक्षा स्टँड, बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्या जीपगाड्या, त्याचबरोबर कराड, सातारा, उंब्रज, ढेबेवाडी, मणदुरे आदी ठिकाणाहून येणार्या एस.टी. गाड्या येथे थांबविल्या जातात. त्यातच हा विजापूर-गुहाघर राज्यमार्गाचा भाग असल्याने खाजगी ट्रक वाहतूक व चारचाकी वाहने, दुचाकी वाहने यांची सतत रेलचेल असते. त्यामुळे बर्याच वेळा जुन्या बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत असून पादचार्यांना रस्त्यांना जाणे देखील जिकिरीचे होत असते.
पाटण पोलीस ठाण्यात वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस कर्मचारी असताना ही कोंडी का होते हे समजत नाही. वाहतुकीची कोंडी सातत्याने होत राहिल्याने वाहनांच्या रांगाच्या रांगा लागतात. त्यामुळे आडवी तिडवी वाहने उभी करून वाहतुकीची कोंडी केली जाते. यावर तातडीने नियंत्रण राखले जावे, अशी मागणी पादचारी वर्गातून व स्थानिक नागरिकातून केली जात आहे.
जुन्या बसस्थानक परिसरात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय कार्यालय व शाखा कार्यालय आहे. त्याचबरोबर जुन्या बसस्थानक परिसराशेजारीच भाजी मंडई, मच्छी मार्केट असल्याने तिकडे जाणार्या स्थानिक ग्राहकांचाही ओघ नेहमीच सुरू असतो. या परिसरातच बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्या जीपगाड्याही रस्त्यावर आणून लावल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होताना दिसते. मे महिन्याच्या सुट्टीत खाजगी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर कराड, सातारा, सोलापूर, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, बेळगाव, बंगलोर, मुंबई, रत्नागिरी, गुहाघर, मंडणगड, दापोली, तळकोकण आदी ठिकाणी जाणार्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे केरा पुलापासून रामापूर येथील वडार नाक्यापर्यंत वाहनांची गर्दी होताना दिसते.
सकाळपासून सायंकाळपर्यंत जुना बसस्थानकावरील वाहतुकीची कोंडी हटत नाही तर सायंकाळच्यावेळी नव्या बसस्थानक परिसरात ट्रॅव्हल्सच्या गाड्या हमरस्त्यावर लावल्या जात असल्याने सायंकाळी ५.३० पासून ८.३० पर्यंत या परिसरात देखील वाहतुकीची कोंडी होताना दिसते. ट्रॅव्हल्सच्या गाड्या रस्त्यावर उभ्या करून प्रवासी भरले जात असल्याने येणार्या जाणार्या अन्य वाहनांना रस्ता मोकळा सापडणे मुश्कील होते. त्यामुळे त्या कालावधीत नवीन बसस्थानक परिसरात देखील वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असून त्यावरही नियंत्रण राखले जाणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणेने यावर उपाय काढून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक जनतेतून केली जात आहे.
केरा पुलापासून ते नवीन बसस्थानक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा छोट्या, मोठ्या व्यापार्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. दोन वर्षापूर्वी पाटण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पद्मा कदम यांनी रस्त्याच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे काढून केरा पूल ते नवीन बसस्थानक हा रस्ता वाहतुकीस खुला केला होता. आता पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणे वाढली असून परिस्थिती जैसे थे बनली आहे. या परिसरातील वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी यापूर्वी येथे चार चार वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी काम करत होते. आता मात्र या ठिकाणी कोणीच दिसून येत नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचारी दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.