ठाणे : : एचपीसीएलच्या तेल पाइपलाइनला शनिवारी सायंकाळी लागलेली आग आटोक्यात आणण्यात मुंबई अग्निशमन दलाला रविवारी सकाळी यश आले. ही आग शेजारीच असलेल्या अन्य तेल कंपन्यांच्या इंधन टाक्यांपर्यंत पसरली असती तर चक्क अर्धी मुंबई जळाली असती, अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.
शनिवारी शिवडीजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम चालू होते. सदर काम चालू असताना सायंकाळच्या सुमारास आग लागली. एचपीसीएलला आग आटोक्यात आणता आली नाही. त्यानंतर बीपीसीएल कंपनीची मदत घेण्यात आली, परंतु आग वाढतच गेली. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.
दरम्यान, तेल कंपन्यांच्या तंत्रज्ञांना आग लागलेली पाइपलाइन इतर पाइपलाइनपासून वेगळी करण्यात यश आले. मात्र, पाइपलाइन पूर्ण पेट्रोलने भरलेली असल्यामुळे काही केल्या आग विझत नव्हती. शिवडी-वडाळा परिसरात मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) आहे. येथे इंडियन ऑॅइल, भारत पट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मोठमोठ्या इंधन टाक्या आहेत. आग पसरून या इंधन टाक्यांपर्यंत पोहोचली असती, तर सीएसटीपर्यंतची मुंबई जळाली असती, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी सांगितले.
आग इतकी मोठी होती की पोर्ट ट्रस्टच्या परिसरातील एक किमीच्या परिघातील तिवरांना (मँग्रोव्ह) आग लागल्याचे रविवारी सकाळी दिसून आले. सुमारे 13 तास भडकणार्या या आगीत पाइपलाइनमधील 70 हजार लिटर पेट्रोल जळाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी दिली.
पेट्रोलच्या पाइपलाइनची आग विझत नसल्याने ती विझविण्यासाठी फोम टेंडर्सचा वापर करण्यात आला. तेलकणांभोवती फोमचे आवरण तयार होऊन त्यांचा ऑक्सिजनशी संपर्क तुटतो म्हणून तेलविहिरींच्या आगीत फोम वापरतात.
रात्री आगीचा भडका वाढल्यामुळे या परिसरातून जाणारा ईस्टर्न फ्री वे (पूर्व मुक्त मार्ग) बंद ठेवण्यात आल्याने दक्षिण मुंबईतून कामावरून सायंकाळी घरी परतणार्या वाहनचालकांना जेजेच्या पुलाचा रस्ता पकडावा लागला.
तेल कंपन्यांची अग्निशमन यंत्रणा अपयशी ठरल्याचे या घटनेने दाखवून आहे. त्यामुळे वडाळा, शिवडी परिसरातील तेल कंपन्यांच्या इंधन टाक्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास मुंबईचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.