नवी मुंबई : पहाटेपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. दोन्ही मार्गांवर गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. दरम्यान, मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरल्याने रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.
पावसाचा जोर वाढताच लोकलचे वेळापत्रक कोलमडण्याचे शुक्लकाष्ठ उपनगरीय प्रवाशांच्या मागे लागले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज सकाळपासूनच प्रवाशांची रखडपट्टी झाली. रेल्वे प्रशासनाकडून गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत असल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात गाड्या किमान 25 मिनिटं उशिरा धावत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. पनवेल, वाशी, बेलापुर, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, डहाणू, पालघर, विरार, वसई येथून मुंबईत कामासाठी येणारे चाकरमानी आज सुमारे तासभर उशिरा कार्यालयात पोहोचत आहेत.
उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळा उघडल्या असताना नवे कपडे, नवा रेनकोट, नव्या दफ्तरासह निघालेल्या बच्चेकंपनींचीही पावसाने तारांबळ उडवली. दादरमधील हिंदमाता भागात सकाळीच पाणी तुंबले त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. दादर आणि परिसरात बर्याच शाळा असून वाहतूक कोंडीत शाळांच्या बस अडकल्याने मुंलाना वेळेत शाळा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. शाळेच्या बसमधून उतरून अनेक विद्यार्थी पायपीट करतानाही दिसत होते.