मुंबई : मुंबई मेट्रोसाठी तिकीट हे एकमेव कमवण्याचे साधन नसून मेट्रो स्थानकांवरील जाहिराती, मेट्रोवर लावलेल्या जाहिराती, स्थानकांवर भाड्याने दिलेले स्टॉल्स यांच्या माध्यमातूनही मुंबई मेट्रोची बक्कळ कमाई होत आहे.
प्रवासासोबत प्रवाशांना खरेदी करता यावी तसेच चटपटीत पदार्थावर ताव मारता यावा, यासाठी प्रत्येक स्थानकांवर स्टॉल्सची सोय करण्यात आली आहे.
मेट्रोने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांसोबत हातमिळवणी केली असल्याने या कंपन्यांचे खाद्यपदार्थ, विविध वस्तू मेट्रो स्थानकांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. त्यामुळे मागील एक वर्षात यांच्या माध्यमातून मुंबई मेट्रोने जवळपास 13 कोटींचा गल्ला कमवला आहे.
वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गावर धावणार्या मेट्रोला 8 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या मेट्रोतून दररोज अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो सेवेत दाखल झाल्यापासून ते आतापर्यंत 8 कोटी नागरिकांनी प्रवास केल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) प्रवक्त्याने सांगितले.
त्यामुळे मागील एक वर्षात तिकिटांच्या माध्यमातून मेट्रोने चांगलीच कमाई केली. तसेच इतर माध्यमातूनही मेट्रोने कोट्यवधींची कमाई केली आहे. मेट्रो मार्गावर एकूण 12 स्थानके आहेत. या स्थानकांवर 52 स्टॉल्स आहेत. यात खाद्यपदार्थ, विविध वस्तूंच्या स्टॉल्सचा समावेश आहे.
अंधेरी आणि घाटकोपर ही मेट्रोची अधिक गर्दीची स्थानके असल्याने या स्थानकांवर अधिक स्टॉल्सची सुविधा देण्यात आली आहे. अंधेरी स्थानकावर 8 तर घाटकोपर स्थानकावर 7 आणि उर्वरित स्थानकांवर 3 स्टॉल्स आहेत. हे स्टॉल्स भाड्याने दिले असल्यामुळे यांच्या माध्यमातून मागील एक वर्षात 6.6 कोटींची कमाई झाली आहे, अशी माहिती एमएमओपीएलच्या प्रवक्त्याने दिली.
मेट्रोने विविध कॉर्पोरेट कंपन्यांसोबत हातमिळवणी केली असून मेट्रो स्थानकांवर असणार्या एलईडीवर, फलकांवर, मेट्रोच्या आत या जाहिराती सतत झळकत असतात. या जाहिरातींच्या माध्यमातून 6.5 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.