नवी दिल्ली : आयपीएल आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या ललित मोदीला परदेश प्रवासासाठी मदत केल्यामुळे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अडचणीत सापडलेल्या असताना, आता या प्रकरणावरुन भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार कीर्ति आझाद यांनी सुषमा स्वराज यांना पाठिंबा देताना भाजपामधील एक जण आणि एका पत्रकाराने स्वराज यांच्या विरुध्द कट रचल्याचा आरोप केला आहे.
कीर्ति आझाद यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उ़डवून दिली असून, तो नेता कोण आहे ? यावरुन तर्क-वितर्काना उधाण आले आहे. आझाद यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. अस्तीन का साप. कोण आहे तो साप ओळखा ? मी सुषमा स्वराज यांच्यासोबत आहे असे आझाद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पक्षामधल्याच एकाने सुषमा स्वराज यांनी ललित मोदीला मदत केल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये फोडली असे स्पष्ट संकेत आझाद यांनी ट्विटमधून दिले आहेत. त्यामुळे येणार्या दिवसांमध्ये भाजपामध्येच अंतर्गत कुरघोडीचे राजकारण पहायला मिळू शकते.
भाजपामध्ये सुषमा स्वराज या लालकृष्ण अडवाणी गटाच्या म्हणून ओळखल्या जातात. पंतप्रधानपदासाठी आडवाणींचे स्वराज यांच्या नावाला समर्थन होते. त्यामुळे स्वराज यांना नक्की कोणी अडचणीत आले असा प्रश्न निर्माण झाला आहे. कीर्ती आझाद यांचे क्रिकेटवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी मतभेद आहेत. दिल्ली क्रिकेट असोशिएशनच्या नियंत्रणावरुनही दोघांमध्ये स्पर्धा आहे.