सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत सलग 15 वर्षे नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी नगरसेवक नारायण पाटील यांचे मंगळवार, दि.16 जुन रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते. नेरूळ सेक्टर 2-4 येथील शांतीधाम सारसोळे स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या दुसर्या, तिसर्या व चौथ्या सभागृहात नारायण पाटील यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नारायण पाटील यांच्या प्रभागाचे दोन प्रभागात रूपांतर झाले. दोन्ही प्रभाग महिला वर्गाकरता आरक्षित झाल्याने नारायण पाटील निवडणूक रिंगणात सहभागी होवू शकले नाही. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावाच्या विकासपर्वाच्या शुभारंभाचे साक्षीदार म्हणुन नारायण पाटील यांना ओळखले जात आहे.
नारायण पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच सारसोळे गावातील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी जमली. यामध्ये सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत, नगरसेवक काशिनाथ पवार यांच्यासह विविध पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
स्मशानभूमीत ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणारे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, महापालिकेतील उपमहापौर अविनाश लाड, महापालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, नगरसेवक विलास भोईर, शिवराम पाटील, सुरज पाटील, गिरीश म्हात्रे, रविंद्र इथापे, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, दिलीप घोडेकर, रमेश शिंदे, नवनाथ चव्हाण, तुकाराम कदम, के.एन.म्हात्रे, किसमत भगत, डी.डी.कोलते, गणेश रसाळ, अनिल लोखंडे, यांच्यासह विविध पक्षाचे नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी उपस्थित होेेते.
गणेश नाईक, नामदेव भगत यांनी यावेळी श्रध्दाजंलीपर भाषणातून नारायण पाटील यांच्या जीवनपटाचा, सेवाभावी वृत्तीचा, कार्यप्रणालीचा आढावा घेतला. नारायण पाटील यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंड असा विशाल परिवार आहे. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक भागातील रहीवाशी मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.