ठाणे : मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक उद्या (बुधवार, १७ जून) होत आहे. यंदाची निवडणूक अधिक चुरशीची बनली असून, उद्धव ठाकरेंनी थेट उडी घेतल्याने रोमहर्षकही बनली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
उत्तम कारकीर्द घडविल्यानंतर व चांगले क्रिकेट खेळत असताना सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर रिटायर झाले, मात्र आपले एमसीएचे अध्यक्ष रिटायर व्हायला तयार नाहीत. स्कोअर बोर्डावर शून्य आकडा आहे, तरीसुद्धा बॅट-पॅड बांधून ते उभेच आहेत, अशा शब्दांत एमसीए अध्यक्ष शरद पवारांवर घाणाघात चढवला. क्रिकेट आणि राजकारण वेगळे ठेवावे असे बोलले जाते, मात्र काही राजकारण्यांनी या खेळाचा खेळखंडोबा केला आहे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, क्रिकेटमध्ये खेळापेक्षा पैशाला महत्त्व देणार्यांनी एमसीएत दुकानदारी सुरू केली आहे. क्रिकेटचा खर्या अर्थाने विकास व्हायला हवा असेल तर ही दुकानदारी मोडून काढा. सर्वसामान्य मुंबईकरही खेळू शकेल अशी मैदाने, अशा सुविधा घडविण्यासाठी आता बदल घडवायलाच हवा. त्यासाठी प्रलोभनांना बळी न पडता क्रिकेटचे हित साधणार्यांना संधी द्या. आम्हाला संधी दिली तर आज ज्यांचे क्लब आहेत त्यांच्याकडे मैदाने किंवा खेळपट्ट्या नाहीत. ही परिस्थिती बदलून मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी चांगली मैदाने, खेळपट्ट्या तसेच सुविधा उपलब्ध करून देऊ. ज्या ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकरही क्रिकेट खेळू शकेल अशी मैदाने उभारली जातील. मी स्वत: रणजी क्रिकेट, कांगा लीग बघायला जायचो. मात्र आज मुंबईचे क्रिकेट पाहिले की हा खेळ वाढतोय की संपतोय, असा प्रश्न पडतो. ठाण्यात दादोजी कोंडदेव मैदान उभारले; मात्र त्या ठिकाणी किती सामने खेळवले? बीकेसी, कांदिवली या ठिकाणी किती सर्वसामान्य मुंबईकर खेळतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. जागा महापालिकेची घ्यायची आणि आपली दुकानदारी करायची. ही पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे पवार गटाकडून उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेने कॉंग्रेसचे विजय पाटील यांची साथ सोडावी, असे त्यांनी म्हटले होते. शेलारांच्या या वक्तव्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, कॉंग्रेसच्या विजय पाटलांची साथ सोडा म्हणणारे हे बोलणारे (शेलार) प्रत्यक्ष कुणाच्या (राष्ट्रवादीच्या पवारांच्या) बाजूने उभे आहेत ते पाहा मग बोला. विजय पाटील यांच्याशी ठाकरे कुटुंबांचे ऋणानुबंध पिढ्यानपिढ्या आहेत. त्यांचे वडील डी. वाय. पाटील यांच्याशी शिवसेनाप्रमुखांचे घनिष्ठ नाते होते. विजय यांचे बंधू अजिंक्य पाटील हे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध दक्षिण कराडमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते. त्यांच्या पाठीशी उभे राहायचे नाही तर कुणाच्या, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शेलारांना विचारला.
बुधवारी १७ जून रोजी एमसीए निवडणुकीत मतांचे गणित ३२९ मतदार एमसीएसाठी मतदान करतील. यात २११ मतदार मैदान क्लबचे आहेत तर कार्यालय क्लबचे ८१ मतदार आहेत. शाळा-महाविद्यालय क्लबचे ३७ मतदार आहेत. दरम्यान, विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट या गटाची रणनिती मातोश्रीवर तयार होत आहे तर, बाळ महाडदळकर गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या मदतीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे धावून आले आहेत. शाळा व महाविद्यालय क्लबच्या ३७ मतदार प्रतिनिधींना महाडदळकर गटाकडे वळविण्यासाठी तावडेंनी स्वत:सह आपल्या क्रीडा खात्याच्या अधिकार्यांच्या मार्फत फिल्डिंग लावली आहे तर, सरकारी कार्यालयांच्या क्रीडा प्रतिनिधींची मते महाडदळकर गटाच्या पारड्यातच कशी जातील याची व्यूहरचना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’वरून करण्यात येत आहे. त्यामुळे तावडे-फडणवीसांनी शाळा व महाविद्यालय क्लबच्या (३७ मतदार) आणि सरकारी कार्यालय क्लब (८१ मतदार) यांच्याशी संधान साधल्याने महाडदळकर गट विजयाकडे आगेकूच करेल असे भाकीत वर्तविले जात आहे.