हागात्ना : २०१८ मध्ये रशियामध्ये होणार्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी सुरु असलेल्या पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये यजमान ग्वामाने भारताला २-१ असे नमवून दुसर्या धक्कादायक निकालाची नोंद केली आहे.
सलग दुसर्या पराभवामुळे पात्रता फेरीतच भारताचे आव्हान धोक्यात आले आहे तर, ‘ड’ गटातून ग्वामाचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. मागच्या गुरुवारी ग्वामाने तुर्कमेनिस्तानच्या संघावर १-० अशा सनसनाटी विजयाची नोंद केली होती.
भारत विरुध्द ग्वामा सामन्यामध्ये भारताचे पारडे जड मानले जात होते. कारण फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारताचा फुटबॉल संघ १४१ व्या तर, ग्वामाचा फुटबॉल संघ १७४ व्या स्थानावर आहे. ग्वामाच्या संघाने निर्णायक सामन्यामध्ये सांघिक कामगिरी उंचावत महत्वपूर्ण विजयाची नोंद केली.
याआधी ओमानकडून भारत २-१ असा पराभूत झाला होता. त्यामुळे भारताला मंगळवारी विजय आवश्यक होता. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला ब्रॅन्ड़न मॅकडोनल्डने ग्वामासाठी पहिला गोल केला त्यानंतर ६४ व्या मिनिटाला ट्राव्हीस निकलॉने दुसरा मैदानी गोल करत ग्वामाची आघाडी २-० ने वाढवली.
सामना संपताना शेवटच्या ९० व्या मिनिटाला भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने गोल केला. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. ग्वामा छोटासा देश असून, त्यांची लोकसंख्या दोन लाखापेक्षाही कमी आहे.
२००० सालानंतर ते प्रथमच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये खेळत आहेत. सन २००० मध्ये इराणकडून १९-० आणि तजाकिस्तानकडून १६-० असा दारुण पराभव त्यांना स्विकारावा लागला होता. २०१८ च्या फुटबॉल वर्ल्डकप आणि २०१९ च्या एएफसी आशिया कपच्या पात्रता फेरीसाठी मंगळवारी एकूण पंधरा सामने खेळले जाणार आहेत.