संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेली योग साधना आता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरी होणार आहे. संयुक्त राष्ट्रानं 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. भारतात योग साधनेचा जन्म झाला असून संपूर्ण जगात याची महती पोहचली आहे. जगभरातील नागरीक योग साधनेकडे आकर्षित झाले. एकट्या अमेरिकेत जवळपास 1.5 कोटी लोकं नियमित योग साधना करत असतात. नवी मुंबई ते रायगडमध्ये आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान असलेल्या वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये रविवार 21 जून 2015 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळात योग साधनेतील प्रशिक्षितांसोबत योग साधनेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी या योग साधनेत भाग घेत असून नवी मुंबईतील नागरीकांनी यात भाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या युगात वाढलेले पाणी, हवा व अन्न प्रदूषण, सात्विक आहाराची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यामुळे प्रत्येकाला शारीरिक व मानसिक आरोग्याची समस्या भेडसावत आहे. आरोग्य सदृढ ठेवण्याबरोबर मनावर ताबा ठेवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे योगासन आहे. योगसाधना ही भारतातील 5000 वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. योगासनामुळे अनेक फायदे असून शरीराच्या व्याधी कमी होण्याबरोबर मानसिक स्थिती खंबीर होते यामुळे रक्त संचलन प्रक्रिया सुधारते, पंचनक्रिया व मानसिक शांतता लाभते, असे मत स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. मेहुल कालावाडिया यांनी व्यक्त केले. या योगसाधनेत भाग घेण्यासाठी 9820332515 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदविणे गरजेचे आहे.