नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या 21 आमदारांविरोधात 24 वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून, दिल्ली पोलिस लवकरच या सर्व प्रकरणांचा तपास पूर्ण करुन संबंधित न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहा आरोपपत्रांमध्ये आरोपी म्हणून समावेश असून, दोन प्रकरणात तपास सुरु आहे. केजरीवाल यांच्यावर बंदी आदेश झुगारुन आंदोलन करणे, सरकारी कर्मचार्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे असे आरोप आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया हे देखील अशाच प्रकरणात आरोपी आहेत. केजरीवाल यांच्या विरोधातील एका प्रकरणात सुनावणीसाठी न्यायालयाने चार ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे.
बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणात माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपचे करोल बागचे आमदार विशेष रवी यांच्या विरोधातील एका प्रकरणात प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
आपचे कोंडलीचे आमदार मनोज कुमार यांच्या विरोधात फसणवूक, सुरक्षा पथकाला चिथवणे, महिलेसोबत असभ्य वर्तन या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. उत्तरनगरचे आप आमदार नरेश बालियान यांच्या विरोधात निवडणुकीच्यावेळी मद्य वाटप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
तिलक नगरचा आप आमदार जर्नेल सिंग यांची सरकारी कर्मचार्याला मारहाण केल्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या पत्नीने त्यांच्यावर शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.