मुंबई : पावसाळ्यात येणार्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी मुंबई महापालिकेची केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांसह इतर १६ रुग्णालये सज्ज झाली आहेत. यंदा महापालिकेने या तीन मोठ्या रुग्णालयांत सुमारे तीन हजार खाटांची सोय उपलब्ध करून दिली आहे.
मागील वर्षी डेंग्यू, मलेरिया आदी आजाराने राज्यात थैमान घातले होते. या आजारांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे यंदा साथीच्या आजारांवर उपचारासाठी पालिका रुग्णालये सज्ज झाली आहेत. यात प्रामुख्याने ५६० खाटा ताप, ६३ मलेरिया रुग्ण, १९ डेंग्यू रुग्ण, १२० गॅस्ट्रो, २४ टायफॉईड रुग्णांसाठी तर उर्वरित ३० टक्के खाटा इतर आजारांवरील रुग्णांसाठी आरक्षित आहेत, अशी माहिती साथरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी दिली.
तसेच महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून कोणत्याही रुग्णांवर जमिनीवर उपचार होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय व रुग्णालयाशी संबंधित सर्व कर्मचारी पावसाळ्यात २४ तास उपलब्ध असतील.
पावसाळी आजारांवर मात करण्यासाठी रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. तसे प्रशिक्षण पालिका रुग्णालयातील डॉक्टरांना देण्यात येत असल्याचे खेतरपाल यांनी सांगितले. मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वच आस्थापनांनी आपल्या क्षेत्रात विशेष काळजी घ्यावी अशा सूचनाही आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.