उध्दव यांची हात जोडून विनंती
मुंबई : ‘पाऊस अजूनही थांबलेला नाही. मिठी नदीचे पाणी धोक्याची पातळी ओलांडत आहे. अशावेळी पुढील अनर्थ टाळण्यासाठी कृपा करून पालिकेला सहकार्य करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मिठीकाठी राहणार्या रहिवाशांना केले.
उद्धव ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना मुंबई जलमय होण्यास एकटी पालिका जबाबदार नसल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईची जबाबदारी केंद्रीत असली पाहिजे. एकच पालक असला पाहिजे. सर्व यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय असला, सहकार्य असले तर मुंबईला नक्कीच चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत पालिकेच्या संपर्कात आहेत. त्यांनी सकाळी पालिकेत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सरकारचं पालिकेला असलेलं हे सहकार्य निश्चितच स्वागतार्ह असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
करीरोडमध्ये तुंबलेल्या पाण्यासाठी उद्धव यांनी एमएमआरडीएला जबाबदार धरले. त्याचवेळी दोष देणारे दोषच देण्याचे काम करत असतात त्याकडे लक्ष देण्याचे कारण नाही. पालिका पूर्ण क्षमतेने काम करत आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला.