रत्नागिरी : मुंबईसह कोकणाला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबईतील परिस्थितीचा फटका कोकण रेल्वेला बसला असून रेल्वेचे आजचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मिर्या-अलावा येथे समुद्राच्या अजस्त्र लाटांचे पाणी बंधारा ओलांडून लोकवस्तीत घुसले होते.
आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७१.४३ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड ९३, खेड ८६.२८, गुहागर ८५, चिपळूण ६९.८८, संगमेश्वर ४५.५८, रत्नागिरी ७८.३८, लांजा ४३, राजापूर ४४ मिमीची नोंद आहे. १ जुनपासून आजपर्यंत जिल्ह्यात ३३४.६८ मिमीची नोंद झाली. पुढील ४८ तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.