जोधपूर : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपा प्रकरणी तुरुंगात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसराम बापूला शनिवारी जोधपूर सत्र न्यायालयाने जामिन नाकारला.
सप्टेंबर 2013 पासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूने जामिनासाठी केलेली याचिका सहाव्यांदा न्यायालयाने फेटाळून लावली. आसाराम जामिन मिळवण्याच्या योग्यतेचा नसल्याचे मत नोंदवत अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी आसारामचा जामिन अर्ज फेटाळून लावला.
आसारामच्या जामिनासाठी भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रयत्न केला. आसारामला या संपूर्ण प्रकरणात गोवण्यात आले आहे ते जामिनासाठी पात्र आहेत असे स्वामींचे म्हणणे होते.
सरकारी वकिल पी.सी.सोलंकी यांनी आसारामच्या जामिन अर्जाला विरोध केला. न्यायालयाने निर्णयाप्रत येण्यापूर्वी पिडीत मुलीचे वय आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी असा युक्तीवाद सोलंकी यांनी केला. सत्र न्यायालयाने यापूर्वी दोनवेळा आसारामचे जामिन अर्ज फेटाळून लावले आहेत. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयानेही आसारामला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.