भोपाळ : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला दिलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घेण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतरही सचिन जाहिरातीत काम करीत असल्याचा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे.
भोपाळमधील व्ही. के. नसवाह यांनी ही याचिका दाखल केली असून ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने टीव्हीवर दिसणार्या जाहिरातीत काम करणे चुकीचे आहे. सचिनने नैतिक जबाबदारी स्वीकारून ‘भारतरत्न’ पुरस्कार परत करावा किंवा केंद्र सरकारने स्वत: पुढाकार घेऊन हा पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी नसवाह यांनी याचिकेत केली आहे. सचिन सध्या अविवा लाईफ इंश्यूरन्स, बूस्ट, एमआरएफ, ल्यूमिनससह १२ जाहिराती करताना दिसत आहे. सचिनने २०१३ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केंद्रातील यूपीए सरकारने सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविले होते.
आतापर्यंत वेगवेगळ्या स्तरांतील नावाजलेल्या व्यक्तींना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाल्यानंतर अद्याप कोणीही जाहिरातीत काम केले नसून सचिन याला अपवाद आहे असे याचिकेन नमूद करण्यात आले आहे.