नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शहरातील नागरीकांना सेवा सुविधा देण्यासाठी स्थापन झाली आहे. ठेकेदारांचे हित जपण्यासाठी नाही, हे ध्यानात ठेवून महापालिका प्रशासनाने यापुढे काम करावे. प्रत्येक प्रकल्प विलंबाने तयार करून होणारी उधळपटी आता थांबवावी, अशी कानउघडणी खासदार राजन विचारे यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाची केली.
महापालिका निवडणूकीच्या तोंडावर नको तितकी कामे काढल्यामुळे नवी मुंबईत महापालिकेची अवस्था दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी झाली आहे. ठेकेदारांना द्यायला पालिका प्रशासनाकडे पैसे राहिले नाहीत. याच पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक शिवराम पाटील, एम. के. मढवी, रंगनाथ औटी, संजु वाडे, उपशहरप्रमुख गणपत शेलार, रोहिदास पाटील, ज्येेष्ठ शिवसैनिक बबन पाटील, अभिमन्यु कोळी, संजय भोसले आदी उपस्थित होते.
ऐरोली, नेरुळ आणि बेलापूर येथील रुग्णालय बांधून तयार होऊन वर्षे उलटत आले आहे. मात्र ते अद्याप सुरु झालेले नाही. यावर खासदार राजन विचार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयाचे बांधकाम सुरु झाल्यानंतर लगेच रुग्णालयात भरल्या जाणार्या पदांची मंजूरी घेणे आवश्यक होते. मात्र सत्ताधार्यांना ते गेल्या पाच वर्षात जमले नाही. आता मात्र प्रशासनाने रुग्णालयाचे हे भिजत घोंगडे पाण्यातून वर काढावे. रुग्णालयातील नोकरभरतीला परवानगी मिळविण्यासाठी मी स्वतः नगरविकास मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहे, असे राजन विचारे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच रुग्णालयात लागणार्या मशिनरीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.