नवी दिल्ली : आयपीएलमधील आर्थिक घोटाळयात आरोपी असलेल्या ललित मोदीला परदेश प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी परराष्ट्रमंत्रीपदाचे वजन वापरणार्या सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने दबाव वाढवला आहे.
युवक काँग्रेसने सोमवारी नवी दिल्लीतील सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन करताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्वराज यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा नरेंद्र मोदी यांनी त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी युवक काँग्रेसने केली.
हाती फलक घेतलेल्या आंदोलकांनी यावेळी स्वराज यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्वराज यांच्या पुतळयाचेही दहन करण्यात आले. काँग्रेसच्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी सफदरजंग रोडवरील स्वराज यांच्या निवासस्थानाबाहेर अडथळेही उभारले होते.
काही आंदोलकांनी हे अडथळे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. जवळपास शंभर आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. पंतप्रधानांनी या प्रकरणी आपले मौन तोडून स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली.