मुंबई : हिट अँड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरोधात अभिनेता सलमान खानने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आता 1 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या खटल्याशी संबंधित पुरेशी कागदपत्रं नसल्याने कोर्टाने आजची सुनावणी स्थगित केली.
सलमानची याचिका आज सुनावणीस आली असता सलमानचे वकील अमित देसाई यांनी न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांना पेपर बूक (पुरावे आणि दस्तावेजाचा संच) तयार नसल्याचे सांगितले. त्यावर दस्तावेज गोळा करण्याचे काम वेगाने करा, असे आदेश देत कोर्टाने याप्रकरणी सुनावणी 1 जुलैपर्यंत लांबणीवर टाकली. सरकारी वकील एस. एस. शिंदे यांनीही यावेळी सुनावणीसाठी नव्याने निश्रि्चत केलेल्या तारखेला सहमती दर्शवली. सलमान खान आज कोर्टात हजर नव्हता. मात्र त्याची बहिण अलवीरा मात्र कोर्टात आली होती.
दरम्यान, 13 वर्षांपूर्वीच्या हिट अँड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणारा सलमान सध्या जामिनावर सुटलेला आहे.