वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत व भर पावसातही उत्साहात मतदान झाले. पावसाचा प्रभाव मतदानावर दिसून आला, तरीही मतदारांनी आपला हक्कआवर्जून बजावल्याचे अनेक भागात दिसले. शहरी मतदारांपेक्षा ग्रामीण मतदारांमध्ये यावेळेसही चांगला उत्साह या निवडणुकीतही पहायला मिळाला. निवडणुकीत सरासरी ५० टक्के मतदान झाले आहे.
महापालिकेच्या १११ प्रभागात ६०७ मतदान केंद्रांवर मतदान झाले. पाऊस फारसा पडणार नाही असे वाटत असतानाच रविवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाल्याने सकाळच्या मतदानावर त्याचा परिणाम झाला. सकाळी ८-९ वाजेपर्यंत काही भागात तुरळक मतदार येत होते. मतदार आपल्या दुचाकी घेऊन किंवा चालत छत्र्या घेऊन येत होते. पावसात, चिखल तुडवत मतदार येऊन आमचा हक्कआम्ही बजावणारच असे सांगत होते. मात्र शहरी भागात सकाळच्या मतदानात उत्साह नव्हता. आगाशी, नंदाखाल व इतर भागात चर्चमधील प्रार्थनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी गेले मात्र ओळखपत्र नसल्याने अनेकांना घरी जाऊन ओळखपत्र आणावे लागले. पावसामुळे राजकीय पक्षांचे बुथ भिजून गेले होते. भर पावसातही सर्वपक्षीय कार्यकर्ते मतदार बाहेर काढण्याचे काम करताना पहायला मिळाले.
विरार पूर्वपट्टीतील कसराळी, भातपाडा, शिरगाव, कामण, पेल्हार या परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा होत्या. दिवसभर मतदारांची ही गर्दी दिसत होती. दिवसभर पाऊस असूनही मतदारांमध्ये ग्रामीण भागात चांगला उत्साह होता. नायगाव, मुळगाव, पापडी तसेच वसई गावात शांतपणे मतदान झाले. वसई गावात दुपारी पाऊस थांबल्यानंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. रविवार असल्याने तसेच पावसामुळे सकाळी शहरी मतदारांनी घराबाहेर न पडता पाऊस थांबल्यानंतर मतदानाला जाणे पसंत केले.
पाऊस पडत असल्याने सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत फक्त ७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला व ९.३० ते ११.३० यावेळेत १७ टक्के मतदान झाले. ११.३० ते १.३० यावेळेत २९ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी १.३० ते साडेतीन वाजेपर्यंत ३८.१५ टक्के मतदान झाल्याचे पालिका आयुक्त गोविंद राठोड यांनी सांगितले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत २ लाख ६२ हजार ३२७ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यात स्त्री १ लाख १४ हजार ४४१ तर पुरुष १ लाख ४७ हजार ८८६ अशी मतदारांची आकडेवारी आहे.