नवी मुंबई: आजच्या धावपळीच्या युगात वाढलेले पाणी, हवा व अन्न प्रदूषण, सात्विक आहाराची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यामुळे प्रत्येकाला शारीरिक व मानसिक आरोग्याची समस्या भेडसावत आहे. योग ही कोणत्याही आजारावरील उपचार पध्दती नाही; तर योग आजाराची कारणे दूर करणारी जीवनपद्धती आहे. योग हे आपल्या जीवनाशी जोडलेलेच आहे. योगाविना आपण जगूच शकत नाही. कळत-नकळतपणे आपण योग करतच असतो. केवळ श्वास घेणे, हाही प्राणायामाचा एक प्रकार आहे, भारतासह संपूर्ण जगभरात रविवारी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला.
आधुनिक मेडीकल सायन्स व योगसाधना यांचा मिलाफ झाला तर शरीर, आत्मा, मन या सर्वांवर संतुलन मिळवता येते हे जाणूनच वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यासाठी नेचरोपथी व योगसाधना यात निष्णांत असलेल्या श्रीमती भाविनी शेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 ते 10 या वेळेत योग शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात डॉक्टर , नर्सेस व हॉस्पिटलच्या कर्मचार्यानी भाग घेतला होता. जीवनाची सुरळीत चाललेली गाडी कुरकुरू नये म्हणून आणि कुरकुरणारी गाडी सुरळीत चालावी म्हणून अशा दोन्ही कारणांसाठी मानवी जीवनात योग महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगातील लाइफस्टाइल आजारांना प्रतिबंध करायचा तर योग अत्यावश्यकच आहे असे उपस्थित डॉक्टरांनी मत व्यक्त केले.