मुंबई : काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचे निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा बंगला आता पाडण्यात येणार आहे. वरदान आशीर्वाद असे या बंगल्याचे सध्याचे नाव असून, या ठिकाणी आता तीन किंवा चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे.
मुंबईतील कार्टर रोडवरील एक जवळची खूण (लँडमार्क) म्हणून राजेश खन्ना यांचा बंगला ओळखला जात होता. राजेश खन्ना यांचे चाहते या ठिकाणी नेहमी गर्दी करीत असत. त्यांचे 2012 मध्ये निधन झाले. हा बंगला शशी शेट्टी या व्यावसायिकाला 95 कोटी रुपयांना विकण्यात आला.
सध्याचे बांधकाम 50 वर्षे जुने असल्याने येथे पुन्हा नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे, असे या उद्योजकाने एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितले. एक-दोन महिन्यांत हा बंगला पाडून नवी इमारत उभारण्याचे काम सुरू होईल.