नवी मुंबई : आपल्याकडे 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या, असे रिझर्व्ह बँकेने आवाहन केले होते. त्यासाठी 30 जून ही अंतिम तारीख दिली होती. आता नोटा बदलण्यासाठी 31 डिसेंबर 2015 ही तारीख दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 2014मध्ये सांगितले होते की, 30 जून 2015 पर्यंत नोटा बदलता येतील. मात्र, जुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा तारीख वाढवून देण्यात आली आहे.
2005च्या आधीच्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये 500 आणि 1000 च्या नोटांचाही समावेश आहे. सुरक्षेच्या कारणामुळं आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून 2005 पूर्वीच्या सर्व नोटा व्यवहारातून बाद केल्या जाणार आहेत. त्यामुळं लोकांनी आपल्याकडील या सर्व नोटा बँकेच्या माध्यमातून बदलून घ्याव्यात, असं आवाहन आरबीआयकडून करण्यात आलं होतं.
याची शेवटची तारीख 1 जानेवारी होती, मात्र त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर 30 जून तारीख देण्यात आली होती. आता नोटा बदलून घेण्याची अंतिम तारिख डिसेंबर 2015 ही असून त्यापूर्वी लोकांनी आपल्याकडील नोटा बँक खात्यात जमा कराव्यात, अथवा त्या बँक शाखांकडून बदलून घ्याव्यात असे आरबीआयनं सांगितलंय.
2005 पूर्वीच्या नोटांवर त्यांच्या छपाईची तारीख देण्यात आली नाही. त्यामुळं नोटांच्या पाठीमागे त्याची छपाई तारीख नसल्यास अशा नोटा संबंधित बँक खात्यांकडे जमा कराव्यात अथवा त्या बदलून घ्याव्यात, असं आवाहन आरबीआयनं लोकांना केलंय.