नवी मुंबई : शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे धोरण आहे.चार जुलै रोजी ही सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना आपापल्या विभागातील शाळा बाह्य बालकांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले असून शनिवारी नवी मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाच्या वतीने मनपा हद्दीतील प्रगणकांना या नोंदणीबाबतची माहिती देण्यासाठी कार्यशाळा भावे नाट्यगृहात शनिवारी घेण्यात आली.
बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ अंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे,नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिलावे हे हक्कप्राप्त झाले आहे.शाळेत न जाणारी बालके ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा प्रवेश घेवून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही असे सहा ते चौदा वयोगटातील बालक आणि विशेष गरजा असणार्या विद्यार्थ्यांना वयाच्या १८ वर्षापर्यंत शाळाबाह्य समजण्यात येईल. (एक महिन्यापेक्षा अधिक काळ शाळेत अनुपस्थित असलेले देखील ) या शाळा बाह्य बालकाच्या व्याख्येनुसार चार जुलै २०१५ रोजी राज्यातील सर्व शाळा बाह्य बालकांची नोंदणी करून त्यानुसार त्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क प्रदान करण्याचा शासनाचा मानस आहे. शाळा बाह्य बालकांची नोंदणी करण्याचे काम प्रगणक म्हणून त्या त्या भागतील शाळांमधील शिक्षकांवर सोपवण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबईतील साडेचार हजार प्रगणकांना या नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्याकरिता शनिवारी नवी मुंबई मनपा शिक्षण विभागाच्या वतीने वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली.तीन सत्रात पार पडलेल्या या कार्यशाळेत शिक्षण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनीगिरे, सहा. आयुक्त तथा शिक्षण अधिकारी दत्तात्रय नागरे, सहायक कार्यकारी अधिकारी हन्नुरकर व हृतीका संखे यांनी उपस्थित प्रगणकांना मार्गदर्शन केले.