नवी मुंबई : नगर विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत अर्थात अटल परिवर्तन आणि शहरी परिवर्तन मिशन तसेच स्मार्ट सिटी मिशनच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या नवी दिल्ली येथील शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची माहिती विशेष स्टॉलद्वारे प्रसारीत करण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस लाभला.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता मोहन डगांवकर आणि त्यांच्या सहकार्यांनी या विशेष माहितीप्रद स्टॉलची निर्मिती केली असून दोन दिवसांत संपूर्ण देशभरातून आलेल्या विविध शासकीय, निमशासकीय संस्थांच्या, प्राधिकरणांच्या हजारो पदाधिकारी, अधिकारी व जिज्ञासू नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली.
पावसाळी पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन राबविल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय नागरी जलपुरस्काराने यापुर्वीच सन्मानीत करण्यात आले असून या अनुकरणीय कार्यप्रणालीची माहिती सर्वांनाच व्हावी यादृष्टीने अमृत व स्मार्ट सिटी मिशनच्या शुभारंभप्रसंगी देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे या कार्यप्रणालीचा माहितीप्रद स्टॉल मांडण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस देण्यात आला होता.
या सादरीकरणामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची दखल आणखी एकवार राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचा आनंद व्यक्त करीत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांनीही या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.