निलम पाटोळे
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला असणार्या प्रभाग ८५-८६मध्ये शनिवारी (दि.२७) सांयकाळी दहावी-बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळविणार्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जावून सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता पाटील, जयश्री ठाकूर व माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
दोन दिवसापूर्वी प्रभाग ८५ मध्ये समाविष्ठ होणार्या कुकशेत गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दहावी-बारावी परिक्षेत नेत्रदीपक यश मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याच अभियानाचा एक भाग म्हणून प्रभाग ८५-८६मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहती, साडेबारा टक्के भुखंडावरील ईमारती व सारसोळे गावातील विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष यशवंत तांडेल, अशोक आतकरी, महादेव पवार, स्वप्निल म्हात्रे यांच्यासह स्थानिक भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या परिश्रमासह शिक्षकांचा व पालकांचाही तितकाच वाटा असतो. दहावीत मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांने हूरळून न जाता यापुढील शैक्षणिक वाटचालीत यशामध्ये सातत्य ठेवावे. आपल्या शैक्षणिक प्रगतीवर घरचा विकास अवलंबून आहे याचे विद्यार्थ्यांने सदोदीत भान ठेवावे.
घरोघरी झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामुळे पालकांनी नगरसेविका सौ. सुजाता पाटील व नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांची प्रशंसा केली. निवडणूकानंतरच्या दोन महिन्याच्या कालावधीत नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी नेरूळ सेक्टर सहा परिसरात दैनंदिन जनसंपर्क ठेवून नागरी समस्या निवारणात पुढाकार घेतला आहे.