नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांची कायम सेवा, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील माथाडी उद्यान व पामबीच मार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी ‘अपघातमुक्त पामबीच’ संकल्पनेतर्ंगत रंबलर बसविणेकरता शिवसेनेचे नगरसेवक व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी सोमवारी (दि. २९ जुन) महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून समस्यांकडे पालिका प्रशासनाचे पुन्हा एकवार लक्ष वेधले आहे.
महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांची सेवा कायम करण्यात यावी यासाठी गेल्या काही महिन्यापासून नामदेव भगत सातत्याने महापालिका प्रशासनदरबारी व मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करत आहेत. सोमवारी महापालिका आयुक्त व महापालिका प्रशासन विभागाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांना नामदेव भगत यांनी लेखी निवेदन सादर करत कंत्राटी कामगारांच्या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
बाजार समिती आवारातील माथाडी भवनालगत असलेल्या माथाडी उद्यानाचा प्रश्नही नामदेव भगत यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने महापालिका प्रशासनदरबारी लावून धरला आहे. उद्यानाला आलेला बकालपणा, उद्यानाशी निगडीत माथाडी कामगारांची भावनिकता, गॅरेजचालकाचे अतिक्रमण या समस्यांचा उहापोह करत माथाडी उद्यानाची दुर्रावस्था दूर करत बकालपणा घालवावा आणि समस्येचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी स्वत: या उद्यानाला भेट देत पाहणी अभियान राबविण्याची मागणी नामदेव भगत यांनी लेखी निवेदनातून केली आहे.
पामबीच मार्गावर वाढत्या अपघाताकडेही नामदेव भगत सातत्याने लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. सोमवारी याच समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधताना पामबीच मार्गावर सिग्नल परिसरात तसेच वळसा मारणार्या चौकात रंबलर बसविण्याची मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे.