एकदिवसीय दाखले वाटप शिबिरात कल्याणकरांना आवाहन
कल्याण : गणेश पोखरकर
महाराष्ट्रच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी दिलेली हाक सार्थ ठरवण्यासाठी आपण पुढे येऊया. मी जर तुमच्यासाठी काही केले असेल वाटत असेल तर मला धन्यवाद न देता पर्यावरण संवर्धनासाठी एक झाड लावा आणि त्याचे संगोपन करा असे आवाहन कल्याण पश्चिमेचे आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी कल्याणकरांना रविवारी एकदिवसीय दाखले वाटप शिबिरात संवाद साधताना केले. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांची तहसील कार्यालया मार्फत मिळणार्या विविध दाखल्यांमुळे दमछाक होते. हि महत्वपूर्ण लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी आमदार पवार यांनी कल्याण तहसील कार्यालयाच्या मदतीने एकदिवसीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक परिसरातील गीत हॉल येथे केले होते. या शिबिराला नागरीकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
एकदिवसीय दाखले वाटप शिबिराच्या माध्यमातून कल्याण शहरातील विद्यार्थी आणि नागरीकांना ज्येष्ठ नागरिक, रहिवासी, अधिवास (डोमेसाईल) आणि उत्पन्नाचे दाखले एकाच दिवसात वितरीत करण्यात आले. या दाखले वाटप शिबिराचा लाभ हजारो नागरीकांनी घेतला. कल्याण तहसील कार्यालयाच्या माध्यामतून राबविण्यात आलेल्या या शिबिराची सुरुवात आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सकाळी १० वाजता करण्यात आली. त्याच प्रमाणे या शिबिराचा समारोप सायंकाळी ६ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दाखले वितरण करून करण्यात आला. या समारोपप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, कल्याण तहसीलदार किरण सुरवसे, नायब तहसीलदार अभिजित देशमुख, भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे, भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, महाराष्ट्र कोळी समाज उपाध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते देवानंद भोईर, महिला आघाडी सरचिटणीस प्रिया शर्मा, कल्याण युवा मोर्चा अध्यक्ष गौरव गुजर, फड सर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी समारोप प्रसंगी संवाद साधताना आमदार पवार यांनी कल्याणकरांना एकदिवासात दाखले देऊन, धन्यवाद देऊ नका एक तरी झाड लावा अशी अनोखी साद घातली. जनसेवा हे माझे व्रत आहे त्यासाठी धन्यवाद नकोच. परंतु महाराष्ट्राच्या ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेले अवाहन पर्ण करण्याचे काम आपण मिळून करूया. तुम्ही एक झाड लावा, त्याचे संगोपन करा आणि त्याचा सेल्फी माझ्या मोबाईलवर व्हॉटस अप करा मला धन्यवाद द्या असे सांगितले. या अवाहनाला उपस्थितांनी अनुकूल प्रतिसाद देत झाडे लावण्याचे आश्वासन दिले. आमदार पवारांच्या भाषणा नंतर नागरीकांना मान्यवरांच्या हस्ते दाखले वितरीत करून शिबिराची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी भाजपा विद्यार्थी आघाडी कल्याण शहर अध्यक्ष सागर तळेकर, किरण भोसले, कुणाल शेलार, शंतनू कोकणे, प्रथमेश पाटील आणि किशोर खैरनार आदींनी विशेष मेहनत घेतली.