ठाणे : मुंब्र्यात रहाणार्या २५ वर्षीय तरुणीने टाडा न्यायालयाकडे अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत विवाह करण्याची परवानगी मागितली आहे. या तरुणीने टाडा न्यायालयामध्ये सहा पानी अर्ज केला असून, न्यायालयाने अनुकूल निर्णय दिला नाही तर, जीवन संपवून घेण्याची धमकी या तरुणीने दिली आहे.
२०१४ मध्ये अबू सालेमने रेल्वे प्रवासात विवाह केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्यावेळी ज्या तरुणीसोबत सालेमचे नाव जोडले गेले होते त्या तरुणीने आता सालेमसोबत रीतसर विवाह करण्यासाठी टाडा न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.
सालेमसोबत नाव जोडले गेल्याने समाजात माझी बदनामी झाली असून, आयुष्य जगणे कठीण झाले आहे. सालेमसोबत विवाह करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. सालेमशी विवाह झाला नाही तर, मला आत्महत्या करावी लागेल असे या तरुणीने १५ जूनला टाडा न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे.
विवाहाचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सालेमला मुंबईतील मॅरेज रजिस्ट्रारच्या कार्यालयात आणण्याची परवानगी तिने टाडा न्यायालयाकडे मागितली आहे. सालेम सध्या तळोजा तुरुंगात आहे.
वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या या तरुणीने मुंबई पोलिसांमुळे आपल्यावर ही वेळ ओढवल्याचा आरोप केला आहे. सालेमसोबत मॉर्फ केलेल्या फोटोवरुन पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली. पोलिसांनी आझमगड, गुजरात, लखनऊ येथे रहाणार्या आपल्या नातेवाईकांकडे जाऊन चौकशी केली. त्यामुळे माझी बदनामी होऊन माझे जगणे मुश्किल झाले आहे, असे या तरुणीने अर्जात म्हटले आहे.