नवी मुंबई : नवी मुंबईतील भूखंडांची विविध उपयोगासाठी विक्री करून मिळालेल्या उत्पन्नातून सिडको याच शहरातील पायाभूत सुविधा विकसित करते. या भूखंडांच्या आधारभूत किंमतीबाबतचे धोरण सिडकोने १९९८ मध्ये आखले. त्यात २००० व २००३ मध्ये किरकोळ सुधारणा करण्यात आल्या. या महिन्यात २३ तारखेला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकित आणखी काही सुधारणा करण्यात आल्या व त्यास मान्यताही देण्यात आली.
प्रत्येक नोडसाठी दरवर्षी राखीव किंमत निश्चित करण्यात येते. या राखीव किंमतीत काही टक्के वाढ करून आधारभूत किंमत ठरविण्यात येते.
सध्या प्रचलित असलेल्या १३ नोडस् आणि नोडविरहीत क्षेत्रातील राखीव किंमती पुढील प्रमाणे आहेत. ऐरोली ७५०० रू., घणसोली ६५०० रू., कोपरखैरणे – ८७३५ रू., वाशी १२,७६० रू.,
सानपाडा १०,६५० रू., नेरूळ १०,९६० रू., बेलापूर ७,६८० रू., खारघर ७,६८० रू., नवीन पनवेल – ७१०० रू., कळंबोली – ५४०० रू., जुई-कामोठे ५,४०० रू., द्रोणागिरी ५,५८० रू., उलवे ४,९५० रू., तर नोडविरहित क्षेत्र ६४०० रू. हे दर सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रचलित धोरणानुसार राखीव किंमतीत २५० टक्केवाढ करून म्हणजेच २.५ पट वाढ करून आधारभूत किंमत निश्चित केली जाते. ही आधारभूत किंमत सिडको विक्रीस काढत असलेल्या भूखंडांच्या निविदेमध्ये नमूद केलेली असते. निविदेला मिळालेल्या प्रतिसादात विकासक आधारभूत किंमतीच्या दुप्पट ते तिप्पट भाव कोट करतात. या धोरणात करण्यात आलेल्या बदलानुसार राखीव किंमतीत आता ३०० टक्के म्हणजेच तिप्पट वाढ करण्यात आली आहे.
द्रोणागिरी आणि उलवे या विकसनशील नोडसह, नोडविरहीत क्षेत्रातील निवासी भूखंडांच्या आधारभूत किंमतीत २५ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. प्रचलित आधारभूत किंमत धोरणात या क्षेत्रातील आरक्षित किंमतीत २००टक्के वाढ करण्यात येत होती. आता त्यात २५० टक्के वाढ करण्यात आली आहे. उलवे नोडमधील राखीव किंमत प्रति चौ.मी.ला ४,९५० रू. एवढी असून तिची दुप्पट किंमत ९,९०० रू. एवढी होते. अडिचपट (२५० टक्के) वाढ करण्यात आल्यामुळे आता आधारभूत किंमत
रू. १२,३७५ एवढी होईल. तुलनेने यात केवळ २५ टक्के वाढ होईल. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आणि जुई-कामोठे या नोडमधील निवासी भूखंडांच्या आधारभूत किंमतीत केवळ २० टक्के वाढ करण्यात आली आहे.