नवी मुंबई : आदिवासी भाग असलेल्या कातकरी पाड्यातील अंगणवाडीचा विकास विशेष निधीअंतर्गत आणि त्याचबरोबर या भागात आमदार निधी देवून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार संदीप नाईक यांनी सोमवारी दिली.
कातकरी पाड्याचा पाहणीदौरा आमदार नाईक यांनी केला. या भागातील नागरिकांशी संवाद साधला. महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के, नगरसेविका मनिषा भोईर, परिवहन समिती सभापती रामनाथ भोईर, परिवहन सदस्य सुरेश पाल, माजी परिवहन सभापती मुकेश गायकवाड, माजी नगरसेविका शोभाताई पाटील, ज्ञानेश्वर लोहार, प्रकाश सुरवडे ,शशिकांत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
कातकरी पाडा येथील समस्यांची माहिती आमदार नाईक यांनी घेतली. या भागात आदिवासी निधीअंतर्गत सुरळीत वीजपुरवठा, पाणीपुरवठा तसेच नियमित साफसफाई केली जावी, अशी सुचना पालिकेच्या अधिकार्यांना केली आहे. कातकरी पाडा येथे शौचालयाच्या निर्मितीसाठी आमदार निधी देण्याचे त्यांनी या प्रसंगी जाहिर केले.
येथील नागरिकांना विविध सरकारी घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी धोरण तयार करण्याची सुचना महापौर सोनावणे आणि स्थायी समितीच्या सभापती शिर्के यांना केली. या भागात काही विद्युत दिवे बंद अवस्थेत होते. ते निदर्शनास आल्यानंतर पालिकेचे विद्युत विभागाचे प्रमुख राव यांच्याशी संपर्क साधून हे दिवे त्वरीत सुरु करण्याची सुचना केली.