आग्रा : सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघूशंका करणे अयोग्य असल्याचे नेहमीच सांगितले जाते. या प्रकरणी कायदेशीर दंडाची तरतूददेखील आहे. पण अशा प्रकरणामध्ये संबंधित दोषींवर कारवाई होतेच असे नाही. देशात प्रथमच आग्रा येथे रेल्वे स्थानकावर उघड्यावर लघूशंका करणार्या १०९ लोकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आग्रा विभागीय पोलिसांनी ही कारवाई केली.
रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म आणि रेल्वे लाइनवर लघूशंका करत असताना या लोकांना अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे लोकांना येथील रेल्वे स्थानकावर उभे राहणेदेखील अशक्य झाले होते. रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेसाठी आग्रा डिव्हिजनच्या १२ स्थानकांवर ४८ तास विशेष अभियान चालविण्यात येत आहे. रेल्वे स्थानक परिसरामध्ये अस्वच्छता करणार्या महिला आणि शाळकरी मुलांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. अटक झालेल्या बहुतांश जणांनी नंतर शंभर ते हजार रुपयांचा दंड भरून स्वत:ची तुरुंगातून सुटका करून घेतल्याचे उघड झाले आहे.
* पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचाच ही कारवाई एक भाग आहे. कायदा तोडणार्या लोकांवर कलम ३४ नुसार कारवाई करण्यात आली.
– गोपेशनाथ खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक