नवी दिल्ली : माहिती अधिकारात मागितलेली माहिती ३० दिवसांत देण्याचे बंधन असताना उपराष्ट्रपती कार्यालयाने मात्र अवघ्या दोन दिवसांत माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
मल्लापुरम येथील पारसनाथ सिंग यांनी २२ जून रोजी उपराष्ट्रपतींच्या कार्यालयात अर्ज करून मागवली होती. २४ जूनला त्यांना माहिती अधिकारात उत्तर मिळाले. ‘२१ जून रोजी राजपथावर पार पडलेल्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित का राहिला नाहीत?’, अशी माहिती सिंग यांनी मागितली होती. त्यावर ‘योग दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने आपण उपस्थित राहिलो नाही’, असे उत्तर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कार्यालयाने दिले.
या तत्परतेबद्दल उपराष्ट्रपती कार्यालयाचे कौतुक केले जात असून ‘उपराष्ट्रपती कार्यालयाने तात्काळ दिलेल्या या उत्तराचा आदर्श सरकारी अधिकार्यांनी ठेवला पाहिजे. अवघ्या दोन दिवसांत उत्तर देणे ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे’, असे माजी मुख्य माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा यांनी सांगितले. तर राष्ट्रपती, पंतप्रधान व उपराष्ट्रपती यांच्यासह वरिष्ठ कार्यालयांनी अन्य सरकारी कार्यालयांसमोर असाच आदर्श निर्माण केला पाहिजे, असे माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी म्हणाले.