नवी मुंबई : नवी मुंबई शहराची वेगळी ओळख आज राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. नवी मुंबईची पर्यावरण समृध्द शहर अशी ओळख निर्माण करण्याचा ध्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने घेतला आहे. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून शहराची आगामी काळात ओळख निर्माण होईल, असा आशावाद महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखल्या जाणार्या आ.संदीप नाईक यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवार, दि. ६ जुलै रोजी ऐरोली मतदार संंघात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने ऐरोली येथील टोल नाका परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ.नाईक यांनी वरील प्रतिपादन केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नवी मुंबई शहर अध्यक्ष अनंत सुतार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष जयेश कोंडे, कार्यक्रमाचे आयोजक नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे राहुल शिंदे, त्याचबरोबर माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेवक तात्या तेली, समाजसेवक सीताराम मढवी, समाजसेवक दीपक पाटील, शिवाजी खोपडे, कैलाश गायकर, सतिष काळे, विठ्ठल बांगर, पराग पाटील, राजू शर्मा, राजू धनावडे, हिरामण नाईक, शशी सुवर्णा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. नाईक म्हणाले की, पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी युवा पिढीने पुढे येणे गरजेचे आहे. तर प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या व पर्यावरण घातक प्लास्टिक साहित्याचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कार्यक्रमाचे आयोजक राहुल शिंदे यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आला असून आगामी कालावधीत विद्यार्थी सेलच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.