नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १० मधील महापालिकेच्या अण्णासाहेब पाटील उद्यानात माथाडी कामगारांचे श्रध्दास्थान असणार्या कै.आ.अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा बसविण्याची तसेच उद्यानाच्या एका बाजूला माहिती फलकाद्बवारे जीवनपट सादर करण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सेक्टर १० परिसरात महापालिकेचे अण्णासाहेब पाटील उद्यान आहे. या उद्यानाच्या सभोवताली एलआयजीचा परिसर असून या परिसरात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणारे माथाडी, मापाडी, वारणार, मेहता तसेच व्यापारी आदी घटकांचे निवासी वास्तव्य आहे. अण्णासाहेब पाटील उद्यान हे महापालिकेच्या प्रभाग ९४ मध्ये येत असून या ठिकाणी अपक्ष नगरसेविका सौ. गवस या कार्यरत आहेत. माझ्या प्रभाग ९३ मध्ये नेरूळ सेक्टर १० परिसराचा काही भाग मोडत आहे. माझ्या प्रभागात असणार्या बाजार आवारातील घटकांंनी या उद्यानात अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा बसविण्याची तसेच उद्यानाच्या एका कोपर्यात अण्णासाहेबांच्या जीवनपटावर माहिती फलक बसविण्याची मागणी केली असल्याचे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी म्हटले आहे.
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्याचमुळे महाराष्ट्रात माथाडी कायदा लागू झाला आहे. माथाडी कामगारांचे श्रध्दास्थान म्हणून अण्णासाहेब पाटील यांना आज महाराष्ट्रात आदरयुक्त स्थान आहे. नेरूळ सेक्टर दहा परिसरात, दोन परिसरात, आठ परिसरात मोठ्या संख्येने माथाडी कामगारांचे निवासी वास्तव्य आहे. या अण्णासाहेब पाटील उद्यानात महापालिका प्रशासनाने अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा बसवून उद्यानाच्या एका कोपर्यात अण्णासाहेबांच्या जीवनपटावर आधारीत माहितीफलक बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने स्थानिक अपक्ष नगरसेविका सौ. गवस यांच्याशी याबाबत चर्चा करून नेरूळ सेक्टर दहा परिसरातील बाजार आवारातील घटकांच्या याप्रकरणी असलेल्या भावना त्यांच्या लक्षात आणून द्याव्यात. याप्रकरणी त्यांच्याशी विचारविनिमय करून महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर नेरूळ सेक्टर दहामधील अण्णासाहेब पाटील उद्यानात अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा व उद्यानाच्या एका कोपर्यात अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनपटावर आधारीत माहितीफलक बसविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.