नवी मुंबई : क्रीडा क्षेत्रात नवी मुंबईचा नावलौकिक उंचविणारे क्रीडापट्टू बी.बी.नायक यांनी तीन विश्वविक्रम करुन पुन्हा एकवार गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली नाममुद्रा उमटवली आहे. त्यांनी 1 मिनिटांत मार्शल आर्ट प्रकारातील 250 किकस् मारल्या त्यानंतर 1 मिनिटांत 75 उठक-बैठक (नॉर्मल स्कॉट) मारल्या तसेच एका मिनिटांत 71 वेळा पाय मागे पुढे करण्याचा विक्रम (मोस्ट अल्टरनेट स्कॉट इंन 1 मिनिट) केला. अशाप्रकारे तीन विश्वविक्रमी नोंदी करुन नवी मुंबई शहराचे नाव नव्याने जागतिक पातळीवर नेले आहे. पत्रकारीता क्षेत्रातही आपली वेगळी ओळख जपणारे आंतरराष्ट्रीय क्रीडापट्टू व दर्जेदार खेळाडू घडविणारे कोच बी.बी.नायक यांचा तसेच नवी मुंबई महानगरपालिकेत वाहन चालक पदावर कार्यरत श्री. महेश ढवळे यांचे सुपुत्र प्रसाद महेश ढवळे याने 29 मे 3 जून या कालावधीत 120 तास नॉनस्टॉप स्पीड स्केटींग रिले या क्रीडा प्रकारात कर्नाटक राज्यात राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल त्यांचा महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते सर्वसाधारण सभेप्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी. बोर्डाच्या निकालात नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल एकुण 95.45 टक्के लागला असून त्यामध्ये शिरवणे, करावे, वाशी, दिवाळे, महापे या शाळांचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. शिक्षण व्हिजन अतंर्गत महानगरपालिका राबवीत असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धोरण यशस्वी झालेले दिसत असून मागील काही वर्षात महानगरपालिकेच्या शाळांचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उंचावताना दिसतो आहे.
यावर्षी सानपाडा माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी कु. पुजा राकेश यादव हिने 91.60 टक्के गुण संपादन करुन महापालिका शाळांत सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तसेच सेक्टर 5, कोपरखैरणे माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी राजश्री सोपान चिकणे हिने 91.20 टक्के गुण संपादन करुन व्दितीय क्रमांक आणि खैरणे ऊर्दु माध्यमिक शाळेचा विद्यार्थी कु. सय्यद अहमद रझा इकबाल याने 91 टक्के गुण संपादन करुन तृतीय क्रमांक पटकाविला.
त्याचप्रमाणे देशा परदेशात नावाजला जाणारा महानगरपालिकेचा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हा अभिनव उपक्रम असून या केंद्राचाही निकाल 100 टक्के लागलेला आहे. केंद्रातील प्रतिक केदार या विद्यार्थ्याने 81 टक्के गुण संपादन केले असून जस्मित कौर या विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यमातून 75 टक्के गुण मिळविलेले आहेत. आकाश देवकर या विद्यार्थ्याने उच्च पातळीच्या विषयांमध्ये 70 टक्के गुण प्राप्त केले आहेत. हे सर्व विद्यार्थी कर्णबधीर असून त्यांचे हे यश निश्चितच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्राथमिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ही ऐच्छिक जबाबदारी स्विकारुन माध्यमिक शिक्षण दिले जाते. त्यामध्ये सर्व सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. त्यामुळे खाजगी शाळांच्या तुलनेत महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी संपादीत केलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. या सहा गुणवंत विद्यार्थ्यांनाही महापालिका सर्वसाधारण सभेप्रसंगी शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.