नाशिक : नाशिकमध्ये सुरू होणार्या कुंभमेळ्याची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे. याच दरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध आणि एड्सचा धोका टाळण्यासाठी नाशिक शहराला 4 लाख 50 हजार कंडोम्सचा पुरवठा करण्यात आलाय.
काही दिवसांपूर्वी, नाशिक शहरात कंडोम्सचा तुटवडा असल्याचं समोर आलं होतं. तसंच शहरात कंडोम्सची मागणी वाढल्याचंही समोर आलं होतं. कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात दाखल होणार्यांची संख्या ध्यानात घेत अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात कंडोम्सची गरज असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हा पुरवठा करण्यात आलाय.
पण, याच दरम्यान एक पवित्र कार्यक्रम म्हणून पाहिल्या जाणार्या कुंभमेळ्याचा आणि कंडोम्सचा मागणी-पुरवठा यांचा संबंध जाहीर करणार्या मीडियाला मात्र टीकेचं धनी व्हावं लागलंय. साधू, संन्यासींनाही या बातमीनं चांगलाच धक्का बसलाय.
नाशिकच्या काही पुजार्यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमणाचे रोग रोखण्यासाठी केली जाणारी जनजागृती योग्यच आहे. पण, कुंभमेळ्याच्या नावावर अनैतिक गोष्टींना थारा दिला जाऊ नये. यामुळे, पवित्र स्नानासाठी दाखल होणार्या अनेक भाविकांच्या श्रद्धेला तडा जाण्याची शक्यता आहे.