वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी नगरसेवक नामदेव भगतांची सूचना
संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुख्य तसेच अंर्तगत रस्त्यावर कोठेही होत असलेली वाहन पार्किग व त्यातून निर्माण होणारी वाहतुक कोंडी यामुळे सुनियोजित नवी मुंबई शहराच्या नावलौकीकाला काळीमा लागत आहे. त्यामुळेच नवी मुंबई शहरात नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यापूर्वी वाहन व्यवस्थेबाबत बिल्डरांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व महापालिकेतील शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सोमवार, दि. 13 जुलै रोजी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात वाहन पार्किगचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. मुख्य रस्त्यावर व अंर्तगत रस्त्यावर निवासी परिसरात वाहनमालक मिळेल त्या जागेवर आपले वाहन उभे करत असल्याने वाहतुक कोंडीचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. नवी मुंबईच्या अधिकांश भागात बांधकाम व्यावसायिकांनी गृहनिर्माण प्रकल्प उभारताना त्या ठिकाणी निवासी वास्तव्य करणार्या रहीवाशांच्या वाहन पार्किगबाबत गांभीर्याने विचार न केल्याने त्या त्या गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशी आपली वाहने सोसायटीसमोरीलच रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी पार्क करत असल्याने त्या रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कारण रस्त्याच्या दुतर्फा बाजूला समोरासमोरील सोसायटीतील रहीवाशी आपली वाहने पार्क करत असल्याचे नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटलेे आहे.
नवी मुंबईतील बाहेरील व अंर्तगत रस्त्यावर निर्माण होत असलेली वाहतुक कोंडीची समस्या व कोठेही वाहनांचे होणारे पार्किग ही बाब आपल्या नियोजित व विकसित असलेल्या नवी मुंबई शहराला भूषणावह नाही. त्या नवी मुंबई शहराच्या नावलौकीकाला कोठेतरी कमीपणा येत आहे. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनानेच कठोरपणे पाऊले उचलली पाहिजेत. नवीन बांधकामे होत असलेल्या सर्वच ठिकाणी संबंधित बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिकांने संबंधित गृहनिर्माण प्रकल्पात किती सदनिका बांधल्या आहेत, तेथील सदनिकाधारकांच्या दुचाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किगसाठी काय तजवीज करून ठेवली आहे, याची शहनिशा करावी. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी याची पूर्तता केली असेल त्यांनाच भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देवून महापालिका प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी वाहन पार्किगबाबत समाधानकारक पूर्तता केली नसेल त्या गृहनिर्माण प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यात येवू नये. शहराच्या हिताचा विचार करून नवी मुंबईच्या नावलौकीकासाठी तसेच वाहतुक कोंडीला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच कठोर पाऊले उचलणे आता काळाची गरज आहे. समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.