नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग 85-86 व महापालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दि. 15 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास सारसोळे ग्रामस्थांसह नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.
सकाळी 10 वाजता या आरोग्य शिबिरास सुरूवात झाली. प्रभाग 85च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि प्रभाग 86च्या नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सारसोळे गाव, होळी मैदानानजीकच्या साई अपार्टमेंटमधील कोलवाणी माता मित्र मंडळाचे कार्यालय असलेल्या शॉप क्रं. 3 येथे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिरात सहभागी झालेल्यांची मलेरिया व डेंग्यू आजाराची तपासणी केली. साथीचे आजार होवू नये याकरता आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांनी सारसोळे गावात व झोपडपट्टी परिसरात जनजागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचविल्या. दुपारी 1.15 वाजेपर्यत हे आरोग्य शिबिर सुरू होते.
गुरूवार दि. 16 जुलै रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत तुलसी छाया अपार्टंमेंटमील प्रभाग 85 व 86च्या मध्यवर्ती कार्यालयात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग क्रं. 85च्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली.