नवी मुंबई : घणसोली विभागातील राबाडे, गोठिवली भागामधील नागरिकांसाठी नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केलेल्या प्रशासकीय प्रस्तावास बुधवारी सभापती सौ. नेत्रा शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभेमध्ये सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाल्याने या भागातील पाणी पुरवठ्याची अडचण दूर होणार आहे.
राबाडे, गोठिवली भागाला पाणी पुरवठा करणारी नळ जोडणी व जलवाहिनी जुनी व जलकुंभापासून जास्त अंतरावर असल्याने तसेच त्याची पातळी सिध्दार्थनगर राबाडे जलकुंभापासून बरीच खाली असल्याने या नळजोडणीमधून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. ही जलवाहिनी रेल्वे ट्रॅक खालून तसेच ठाणे बेलापूर कॉंक्रीट रस्त्याखालून गेल्याने नादुरूस्त झाल्यावर दुरुस्त करणे शक्य नव्हते.
त्यामुळे सदर जलवाहिनी राबाडा रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एम.आय.डी.सी.च्या जलवाहिनीवर जोडणी करुन ठाणे बेलापूर कॉंक्रीट रस्ता व रेल्वे ट्रॅक या खालून मायक्रोटर्नेलिंग पध्दतीचा वापर करुन जलवाहिनी टाकण्याच्या २ कोटी ९९ लक्ष ८५ हजार रक्कमेच्या कामास आज स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झाली.
रेल्वे प्रवासी वाहतुक सुरु असताना मायक्रोटर्नेलिंगचा पध्दतीचा वापर करुन जलवाहिनी टाकण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या काहिसे अवघड स्वरुपाचे विशेष आहे. एम.आय.डी.सी.च्या जलवाहिनीवर पुरेसा दाब असून सद्यस्थितीत असलेल्या नळ जोडणीच्या ठिकाणापेक्षा ती उंचावर असल्याने नवीन नळ जोडणीव्दारे सध्यापेक्षा अधिक पाणी पुरवठा होईल व राबाडे, गोठिवली परिसरातील नागरिकांची पाणी पुरवठ्याची अडचण दूर होईल म्हणून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.