नवी मुंबईतील 50 वर्षे हा प्रकल्प जुना
नवी मुंबई : पन्नास वर्षापासून अस्तित्वात असलेला नवी मुंबई येथील प्रकल्पाला औषध निर्मात्या फायझरने 16 सप्टेंबर 2015पासून टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पातील उत्पादन 2013पासून बंद असल्याने औषधांच्या पुरवठयावर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच गेल्या वर्षी प्रकल्पातील कामगारांसाठी स्वच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आली असून 212पैकी 132 जणांनी त्याचा स्वीकार केला आहे.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत ठाणे-बेलापूर मार्गावरील हा प्रकल्प बंद करण्याबाबत संबंधित संस्थांना कळवण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या प्रकल्पाची दीर्घकालीन व्यवहार्यता आणि अपेक्षित उत्पादन साधण्याची क्षमता याचा आढावा घेतल्यानंतर हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र हा प्रकल्प बंद झाल्यानंतर औषधांच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार नाही. प्रत्यक्षात 2013पासूनच प्रकल्पातील प्रत्यक्ष उत्पादन थांबवण्यात आले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकल्पातील 212पैकी 132 कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारली आहे. गेल्या वर्षी ही योजना लागू करण्यात आली होती. ही योजना न स्वीकारलेल्या उर्वरित 80 कामगारांना प्रकल्प ठप्प असतानाही नियमित वेतन दिले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रकल्प बंद करण्याच्या प्रक्रियेत कायद्यानुसार योग्य ती भरपाई उर्वरित कामगारांना देण्यात येईल, अशी हमी दिली.