शिवसेना नगरसेवक नामदेव भगतांची महापालिकेकडे मागणी
नवी मुंबई : पामबीच मार्गावर करावे जंक्शन व अन्य ठिकाणी वाढत्या अपघातांवर नियत्रंण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने युध्दपातळीवर भुयारी मार्गाची निर्मिती करावी आणि त्यासाठीचा तातडीचा प्रस्ताव 20 जुलै रोजी होणार्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
शासकीय गरजेपायी निर्माण झालेले नवी मुंबई शहर हे स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या, ग्रामस्थांच्या, आगरी-कोळी समाजबांधवांच्या त्यागातून आणि योगदानातमुळेच विकसित झालेले आहे. शंभर टक्के भूसंपादन असलेले शहर असे नवी मुंबई या देशातील एकमेव उदाहरण आहे. पण सिडकोने व त्यानंतर आलेल्या महापालिका प्रशासनाकडून स्थानिक प्रकल्पग्रस्तांची, ग्रामस्थांची, आगरी-कोळी समाजबांधवांची उपेक्षाच झालेले आहे. मंगळवारी (दि. 14 जुलै) पामबीच मार्गावर झालेले करावेवासियांचे आंदोलन हे त्याच उद्रेकाचे द्योतक असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील वाशी ते बेलापुरदरम्यानची तसेच ठाणे-बेलापुर मार्गावरील पावणे ते बेलापुरदरम्यानची वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी आणि उरण-जेएनपीटीला लवकरात लवकर ये-जा करण्यासाठी सिडकोने पामबीच मार्गाची निर्मिती केली. यथावकाश हा मार्ग सिडकोने महापालिका प्रशासनाकडे हस्तांततरीतही केला. सारसोळे, सानपाडा, करावे येथील स्थानिक मासेमारी करणारे ग्रामस्थ जेटीकडे, खाडीकडे पामबीच मार्ग ओलांडून कशा प्रकारे ये-जा करतील याचा सुरूवातीला सिडकोने व त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. पामबीच मार्गावर वार्याच्या वेगाशी स्पर्धा करत ये-जा करणारी वाहने अनेकदा सिग्नलचे तसेच वाहतुक व्यवस्थेचे पालन करत नसल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. खाडीकडे व जेटीकडे ये-जा करताना मासेमारी करणार्या ग्रामस्थांना आपला जीव मुठीत ठेवूनच ये-जा करावी लागते. करावेच्या ग्रामस्थांचा बुधवारी झालेल्या आंदोलनात्मक उद्रेक हा त्याचाच परिपाक असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
समस्येचे गांभीर्य व परिस्थितीची गरज लक्षात घेवून नवी मुंबई महापालिका प्रशासनाने पामबीच मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी करावे जंक्शन येथे शक्य तितक्या लवकर भुयारी मार्गाची निर्मिती करण्यासाठी युध्दपातळीवर हालचाली करणे गरजेचे आहे. 20 जुलै रोजी होणार्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याविषयाचा प्रस्ताव सादर करावा अशी मागणी नामदेव भगत यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
मंगळवारी करावेच्या संतप्त ग्रामस्थांना सामोरे जाताना महापालिका प्रशासनाच्या वतीने आपण 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव आणणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाला स्मरण करून दिले आहे.