शिवसेना नगरसेवक नामदेव भगतांचे आयुक्तांना साकडे
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान पामबीच मार्गे एनएमएमटीची बससेवा सुरू करण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी बुधवारी (दि. 22 जुलै) महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाचे मुख्यालय बेलापुर किल्ले गावठाण चौकात असून जवळपास कोणतेही रेल्वे स्थानक नाही. त्यामुळे महापालिका मुख्यालयात येणार्या एनएमएमटीच्या बसेसचा अथवा सिवूड्स, बेलापुर रेल्वे स्थानकापासून रिक्षांसेवेचा आधार घ्यावा लागतो. ऐरोली ते वाशी यादरम्यानच्या नवी मुंबईकरांची पालिका मुख्यालयाकडे सध्या होत असलेली येण्या-जाण्याची गैरसोय दूर करण्याकरता महापालिका प्रशासनानेच पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
वाशी रेल्वे स्थानक हे नवी मुंबईकरांकरता मध्यवर्ती ठिकाण आहे. दिघा ते वाशी, तुर्भे परिसरातील नवी मुंबईकर अवघ्या काही मिनिटांमध्ये वाशी रेल्वे स्थानकापर्यत येतो. वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालय यादरम्यान महापालिका प्रशासनाने एनएमएमटीची बससेवा पामबीच मार्गे लवकरात लवकर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वाशी रेल्वे स्थानकावरून पामबीच मोराज सर्कलला वळसा घालून पुन्हा पामबीच मार्ग, सारसोळे जेटी चौकाकडून नेरूळ सेक्टर 6,14, कुकशेत, सेक्टर 16,18,24 मार्गे, सेक्टर 28 मधील दर्गा, मस्जिदच्या मागील रस्त्यावरून सीवूड्स रेल्वे स्थानक, त्यापुढे वसंतराव नाईक उड्डाणपुलाखालून सेक्टर 50 मार्गे महापालिका मुख्यालयापर्यत ही बस जाईल व पुन्हा त्याच मार्गे वाशी रेल्वे स्थानक येथे येईल. यामुळे दिघा ते वाशीदरम्यानच्या तुर्भेसहीत नवी मुंबईकरांना लवकरात लवकर महापालिका मुख्यालयापर्यत ये-जा करणे शक्य होईल. तसेच पामबीच मार्गावर विकसित होत असलेल्या सानपाडा पामबीच परिसरातील मोराज सर्कल येथील वसभोवतालच्या परिसरातील पामबीचवासियांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बससेवा उपलब्ध होईल. आजही सानपाडा पामबीचवासियांना बेस्टच्या बसचा अथवा रिक्षाचा आधार घ्यावा लागत असल्याचे नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबईकरांची महापालिका मुख्यालयात होत असलेली गैरसोय लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शक्य तितक्या लवकर वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालय व्हाया पामबीच मार्गे सुरू करावी अशी मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.