अलिबाग : सलग तिसर्या दिवशीही सोन्याच्या दरातील घसरण कायम असून गेल्या पाच वर्षातील ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. बाजारातील एकंदर स्थिती लक्षात घेता सोन्याचे भाव प्रतितोळा 23 हजारापर्यंत खाली उतरतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तसं झाल्यास सोनेखरेदी करणार्यांसाठी सुवर्णसंधीच चालून येणार आहे.
सोमवारपासून सोनेदराची घसरगुंडी उडाली आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर तब्बल 10 टक्क्यांनी उतरले आहेत. सोमवारी दिवसभरात तब्बल 500 रुपयांनी सोन्याचे दर खाली आहे. मंगळवारी त्यात आणखी घसरण होऊन प्रतितोळ्याला सोन्याचा दर 25 हजारांच्या खाली आला. 2008 नंतरची ही सर्वात मोठी घसरण ठरली. त्याचवेळी लगेचच सोन्याचे भाव वधारण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या लग्नसराई नसली तरी लग्नासाठी दागिने बनवून घेण्याची संधी मात्र चालून आली आहे.
दरम्यान, सराफाबाजाराचा कानोसा घेतला असता सोन्याचे भाव कोसळूनही खरेदीत म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही, असे काही ज्वेलर्सकडून सांगण्यात आले. सोन्याचे भाव आणखी खाली आल्यास ही स्थिती नक्कीच बदलेल. आठवड्याच्या शेवटी खरेदीत वाढ झालेली दिसेल, असेही त्यांना वाटत आहे.