मुंबई : सकाळी विधिमंडळात केवळ हजेरी लावून दिवसभर कामकाजात गैरहजर राहणार्या सत्तारूढ भाजपच्या आमदारांची पक्षाकडून चांगलीच हजेरी घेण्यात येत आहे. प्रत्येक आमदाराची दर दोन तासांनी हजेरी घेतली जात असून, सभागृहाच्या कामकाजात दांडी मारणार्या मंत्री आणि आमदारांची तक्रार थेट भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भाजपबरोबरच विरोधी पक्षही आपल्या आमदारांवर अंकूश ठेवण्यासाठी त्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेत आहेत.
यंदाच्या विधानसभेत दीडशेहून अधिक आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या आमदारांना विधानसभेच्या कामकाजाचे आकलन व्हावे, यासाठी भाजप आणि काँग्रेसने त्यांचे अभ्यासवर्गही घेतले होते. तरीही आमदारांची सभागृहातील अनुपस्थिती ही सत्तारूढ भाजप व विरोधी पक्षातील काँग्रेससाठी चिंतेची बनली आहे. भाजप प्रमुख सत्तापक्ष असतानाही भाजपच्या आमदारांची सभागृहात उपस्थिती कमी असते. मुख्यमंत्र्यांचे सभागृहातील भाषण असले, तरी काही आमदार सभागृहात हजर नसतात. अनेक आमदार सकाळी विधानसभेच्या हजेरीवहीत सही करतात. पण, नंतर सभागृहाकडे फिरकतही नाहीत.
नवीन आमदारांनी सभागृहाचे कामकाज कसे चालते. प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, तसेच विविध विषयांवरच्या चर्चांमध्ये कसे बोलले पाहिजे, तीन किंवा चार टर्म आमदार असलेले नेते कसे बोलतात, हे ऐकण्यातही या नव्या आमदारांना रस नसतो. आमदारांबरोबर काही मंत्रीही आपल्या खात्यांचे कामकाज नसेल, तर सभागृहात येत नाहीत. आपल्या खात्याशी संबंधित विषय संपला की ते सभागृहाबाहेर पडतात. त्यामुळे ही सुद्धा मोठी डोकेदुखी सत्तारुढ भाजपसाठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांची दरदोन तासांनी हजेरी घेण्याचे सुरू केले आहे. हजेरीवहीवर आमदारांची सही घेण्याची जबाबदारी वरिष्ठ आमदारांवर सोपवण्यात आली आहे. तसेच सभागृहात मंत्रीही किती वेळ बसतात, याची माहिती ठेवण्याचे काम संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे आहे. भाजपचे जे मंत्री किंवा आमदार सभागृहाच्या कामकाजात गैरहजर राहतील, त्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देण्यात येते. दानवे यांच्याकडून ही माहिती अमित शहा यांच्याकडे पाठविण्यात येते.
विरोधी पक्षनेतेपद असलेल्या काँग्रेसचेही आमदार सभागृहाच्या कामकाजात गैरहजर राहतात. विरोधी पक्षनेत्यांचे भाषण असले, तरी विरोधी बाकावर फारसे आमदार दिसत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षाची ताकद सभागृहात दिसत नाही. त्यातच काँग्रेसचे बरेच आमदार हे माजी मंत्री आहेत. तेही सभागृहाच्या कामकाजाला दांडी मारतात. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांचीही दिवसातून तीन वेळा हजेरी घेतली जात आहे.