मुंबई : विधानसभेत जोरदार भाषण ठोकून पक्षश्रेष्ठींवर इम्प्रेशन मारण्याच्या नादात तेलगी प्रकरण उकरून काढणं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भलतंच महागात पडलं. आव्हाडांनी नको तो विषय काढल्यानं छगन भुजबळ नाराज झाले आणि त्याची गंभीर दखल घेऊन दादा अजित पवार यांनी आव्हाडांची चांगलीच कानउघाडणी केली. सभागृहात जपून बोलण्याची समजही दादांनी त्यांना दिली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चिक्की आणि डिग्री घोटाळा पहिल्या दिवसापासून गाजतोय. घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजप मंत्र्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं लक्ष्य केलंय. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही त्यांनी रान पेटवलंय. त्यात काही प्रमुख नेतेमंडळी आघाडीवर आहेत आणि सगळ्यात पुढे जितेंद्र आव्हाड दिसताहेत. भाजपविरोधात नारेबाजी करताना त्यांना एक वेगळाच जोश येतो. पण, हा अतिउत्साहच गुरुवारी त्यांच्या अंगलट आला.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपवर हल्ला चढवताना, तेलगी प्रकरणाचा विषय काढून आव्हाडांनी भाजप आमदार अनिल गोटे यांच्यावर निशाणा साधला. गोटे हे तेलगीचे मित्र होते, असा आरोप त्यांनी केला. तो ऐकून गोटे खवळले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनाच आरोपीच्या पिंजर्यात ओढलं. आर. ए. शर्मा यांना आयुक्त करताना भुजबळांनी 10 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. मग, भाजपच्या आमदारांना आयतंच कोलित मिळालं. काहीही संबंध नसताना, आव्हाड-गोटे यांच्या चकमकीत नाव आल्यानं भुजबळ वैतागले, अस्वस्थ झाले. तुमच्या भांडणात जुनं प्रकरण उकरून का काढता, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
आव्हाडांनी तेलगी प्रकरण उकरून काढल्यानं राष्ट्रवादीच गोत्यात आली होती. भाजपनं भुजबळांनाच लक्ष्य केलं होतं. हा प्रकार पाहून अजित पवार चिडले. त्यांनी आव्हाडांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं आणि त्यांचे कान उपटले. तेलगीचा जुना विषय काढायची गरजच काय होती, असा सवाल करत दादांनी त्यांना धारेवर धरलं. त्याचं उत्तर आव्हाडांकडे नसल्यानं, सगळं निमूट ऐकून घेण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता.