* सात तास रेवाडी-दिल्ली रेल्वेमार्ग ठप्प
पानीपत / रेवाडी – हरियाणाच्या रेवाडी येथे एक ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि त्याने ट्रक चक्क रेल्वे रुळांवर नेला. एवढेच नाही तर, रेल्वे ट्रॅकवरुनच त्याने ट्रक चालविला. चालक नशेत असल्यामुळे त्याचा स्वतःवर ताबा राहिला नव्हता. ट्रक रुळांवर आल्यामुळे रेवाडी- दिल्ली मार्गावरील वाहतूक सात तास बंद होती. क्रेनच्या मदतीने ट्रक रुळांवरुन काढण्यात आल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.
गुरुवारी रात्री दोन वाजताच्या दरम्यान झज्जर फ्लायओव्हरच्या खाली ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले, ड्रायव्हर नशेत होता, त्यामुळे त्याचा स्वतःवरील आणि वाहनावरील ताबा सुटला. ट्रकमध्ये सीमेंटच्या गोण्या होत्या. ट्रक रेल्वे रुळांवर आल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद केली होती.
ट्रक रेल्वे रुळांवर आल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी गर्दी केली. ट्रकमधील सीमेटच्या गोण्या उतरवण्यात आल्यानंतर त्याला रुळांवर बाजूला करण्यात आले. ट्रक बाजूला करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जयपूरहून क्रेन मागवले. शुक्रवारी सकाही नऊ वाजता रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत त्याची नशा उतरली होती.