** दिंडीच्या माध्यमातून शासनाच्या विकास योजनांचा जागर
** आमदार नरेंद्र पवारांचा अभिनव उपक्रम
गणेश पोखरकर
कल्याण : अवघ्या भारत खंडाचे पूजनीय असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीचे वेध वारकरी आणि भावीकांना आषाढी वारीच्या निमित्ताने लागले आहे. या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना वारी निमित्त पंढरपूरला जाणे शक्य होते असे नाहीच. यासाठीच हाच त्रिभुवनातील वारीचा दिंडी सोहळ्याचा आनंद कल्याणकरांना देखील आपल्या शहरात अनुभवता येण्यासाठी कल्याण भाजपा जिल्ह्याच्या माध्यमातून भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून दिंडी विकासाची या दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिंडी सोहळा आषाढी एकादशी सोमवार 27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी 4.00 ते 7.00 यावेळात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या उद्देशाने कल्याण शहराच्या नियोजित विकासावर भाष्य केले जाणार असून शासनाच्या विकास योजनांचा जागर केला जाणार आहे. तरी या मंगलमय सोहळ्यात पारंपारिक आणि वारकरी सांप्रदायिक वेशात कल्याणकरांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हान आमदार पवार यांनी केले आहे.
या निमित्ताने केंद्र आणि राज्य शासनाच्या जनसामान्याच्या विकास योजना, शासनाचे लोकउपयोगी निर्णय आणि कल्याण शहराच्या नियोजित विकासाच्या आराखड्याचे प्रदर्शन चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या दिंडी सोहळ्यातून सामाजिक प्रश्नावर विकासाचे धोरण कल्याणकरांना पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या नयनरम्य दिव्य सोहळ्यात कल्याण तालुक्यातील वारकरी भजनी मंडळे सहभागी होणार असून या निमित्ताने कल्याणकरांना वारीच्या भक्तीरसाची गोडी अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर या दिंडीसोहळ्यात कल्याण शहरातील शालेय विद्यार्थी वारकरी आणि पारंपारिक वेशात सहभागी होणार आहेत. या मंगलमय दिंडी सोहळ्याची सुरुवात न्युमानिषानगर बेतूरकर पाडा येथील संत गजानन महाराज मंदिर येथून होणार असून पुढे हा दिंडी सोहळा इंद्र्प्रस्थ, मुरबाड डायव्हर्जन रोड, वायले नगर, खडकपाडा सर्कल, बेतूरकर पाडा चौक, वीर कोतवाल चौकाकडून उजवीकडे, सहजानंद चौक, शिवाजी चौक विठ्ठल मंदिर, येथून सुभाष मैदान येथे रिंगण सोहळा होऊन समाप्त होणार आहे.